सन १३६७ च्या सुमारास ठाणे येथे श्रीमंत प्रताप चक्रवर्ती महाराजाधिराज श्री हंबीरराव राज्य करीत होता. नागांव त्यांच्या राज्यात होते. १६३७ मध्ये मोगलांनी निजामशाही नष्ट केल्यावर ते दिल्लीच्या शहाजहान बादशहाच्या ताब्यात गेले. १६१२ च्या अस्सल कागदपत्रावरून हरी वर्तक हा वतनदार उल्लेखित आहे. बागायती गावात वर्तक असायचा, ग्रामपंचायतीचे काम अमलात आणावयाचे काम वर्तक करीत असे. १६६२ मध्ये अष्टागराचा बराचसा भाग श्री शिवाजी महाराज यांनी ताब्यात घेतला. अण्णाजी दत्तो सुभेदार झाला. भारतात जमीन महसुलाची पद्धत निर्माण करणारी तीन माणसे म्हणून राजा तोडरमल्ल , मलिकवर व अण्णाजी दत्तो यांचा उल्लेख करावा लागतो . अण्णाजी दत्तोने चौल सुभ्यातील जमिनी मोजून त्यांचा महसूल ठरवून दिला. त्यावेळी नागांवचे , नख्त महसुलाचे उत्पन्न ७४३१ लारी ठरले.( साडेतीन लारी = १ रु.) १६९३ मध्ये रघुजी कुलकर्णी नागांवचा कुलकर्णी म्हणून काम पाहत असत.१६९७ मध्ये कान्होजी आंग्रे यांचा उदय झाला. १७१० मध्ये त्यांनी बामणगाव येथे पोर्तुगीझांचा पराभव केला व ते अष्टागराचे धनी झाले.
नागांव पासून सात मैलांवर व मुंबईपासून ११ मैलावर खांदेरी उंदेरी हि दोन बेटे आहेत. मुंबईहून मलबार किनाऱ्यावर वाहतूक करणाऱ्या गलबनाम खांदेरीवरून जावे लागते. खांदेरी उंच व आकाराने मोठे असल्याने ते आपल्या ताब्यात असावे असे सर्वांना वाटे.१६७० मध्ये श्री शिवाजी महाराजांचे लक्ष या बेटाकडे गेले नागांवची सुरक्षित खाडी नसती तर खांदेरी व कुलाबा मराठ्यांच्या हाती राहतेना आणि हे किल्ले नसते तर नागांव व अष्टागराचे संरक्षण झाले असते.
महाराष्ट्र भाषेचा कोश ज्या पंडितांनी १८२९ मध्ये प्रसिद्ध केला त्याचे मुख्य जगन्नाथ शास्त्री कमवंत हे नागांव येथील होते. अलीकडे हे घराणे टिल्लू या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे मदतनिस गंगाधर शास्त्री फडके हेही नागांवचे या मंडळातील परशुरामपंत तात्या गोडबोले वगळले तर इतर म्हणजे रामचंद्र शास्त्री जानवेकर, दाजी शास्त्री शुक्ल हे नागांवचेच. आधुनिक मराठी भाषेचे जनक समजले जाणारे व ज्यांनी इसापनीती बालमित्र वगैरे ग्रंथांची सुंदर भाषांतरे केली ते सदाशिव काशिनाथ छत्रे हे नागांवचेच होते.
हे मंदिर शिवकालापुर्वीचे आहे. त्याचा जीर्णोद्धार ६ जानेवारी १७७२ रोजी राघोची आंग्रे सरखेल यांनी वेदोक्त मंत्रांनी केला. मंदिराजवळील दीपमाळ सहस्त्रबुद्धे यांनी बांधली आहे. समोर तळे आहे. ते १७७३ रोजी राघोजी आंग्रे यांनी बांधले आहे. सर्व बाजूनी चिरेबंदी तांबडा दगड असून तळ्याचे क्षेत्र खूप मोठे आहे. खोली २१ फुट असून वर्षभर पाणी असते. श्रावणात लक्ष बेलपत्रांनी नागेश्वराची पूजा बांधीत. १८१० चे सुमारास बारमाही पूजा बाळकृष्णभट लेले यांचेकडे होती. अवर्षणासारखे संकट कोसळ्यास मंदिरात लघु रुद्र करीत. शिवरात्रीचा उत्सव अद्यापही चालू आहे. १९७९ साली मंदिर जीर्णोद्धार व श्रीहरीनाम सप्ताह शतसांवत्सरीक समितीने स्मरणिका काढून व निधी जमवून जीर्णोद्धार केला आहे.
हे दुसरे शिवकालीन मंदिर आहे. सन १७५८ मध्ये सदाशिवराव भाऊ पेशवे यांची भार्या पार्वतीबाई हिच्याकडून द्रव्य मिळवून नागांवकरांनी याचा जीर्णोद्धार केला. मंदिरासमोरील दीपमाळ विठोबा लोंढे यांनी बांधली. १७६४ मध्ये मंदिरासमोरील पुष्करिणी नारंभट रिसबूड यांनी बांधली. मंदिरात शिवरात्रीचा उत्सव अजूनही होतो व पालखी निघते.१९६१ मध्ये संघ व गावकरी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.मंदिरासमोर तळे आहे. १९७४ मध्ये त्याचा दक्षिणेकडील भिंत नव्याने बांधण्यात आली. भिमेश्वराजवळ श्री नारायणाचे मंदिर आहे. सन १८४० मध्ये ते बाळाजी गणेश सहस्त्रबुद्धे यांच्याकडे वहिवाटीस होते.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केशव महाजन यांना पाऊण लाख रुपये दिले ते खर्च करून सन १७६०-६१ च्या सुमारास त्यांना हे मंदिर, दीपमाळ व पुष्करिणी बांधली. मंदिर दगडी असून त्याच्या दक्षिणेस तळे आहे.
हे मंदिर शिवकालीन असावे. सन १८२९-३० मध्ये ते मोडकळीस आल्यामुळे आंग्रे यांनी चार घोणवासे दोन मोख आणि एक पाठाळूस अशी लाकडे मोफत देऊन ते नव्याने बांधले. १८४० च्या सुमारास बाबजी किंवा गणू वर्तक या मंदिराचा वहिवाटीदार होता.
सन १७८८ च्या सुमारास मराठी शाळेजवळ खोलगट जमीन होती व तेथे पाणी साचत असे. ती भरून काशून श्री गणपतीचे नवीन मंदिर बांधणेत आले. जवळच श्री मुरलीधराची हि प्रतिष्ठापना करण्यात आली.
मराठी मुलींच्या शाळेजवळ हे पुरातन मंदिर आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी जत्रा भरते. देवी नवसाला पावते अशी ख्याती असल्यामुळे भाविक लोक दूरदूरवरून नवस फेडण्यासाठी येतात.
सदर देवळात मारुतीची शेंदरी मूर्ती आहे. स्थानिक लोकांनी समितीस्थापन करून निधी जमवून मंदिर बांधले आहे.
श्री चिदधनस्वामी सखारासबुवांचे शिष्य व समर्थ सांप्रदायिक थोर सत्पुरुष कै. रामकृष्णबुवा माटे यांनी हे मंदिर उभारून दासनवमी उत्सव सुरु केला. येथेच त्यांनी सन १८७९ मध्ये समाधी घेतली. सदर उत्सव गेली ११६ वर्ष चालू आहे. कै. सीताराम विष्णू आठवले व कुटुंबीय यांचा सदर मंदिराशी व उत्सवाशी विशेष संबंध व त्याग आहे. मंदिराचे उत्पन्न व भिक्षा कमी झाल्यामुळे सन १९६८ मध्ये दासनवमी उत्सव समितीने कायमनिधी सुरु करून वीस हजार जमविले. मारुतीची संगमरवरी शुभ्र मूर्ती हे देवस्थानाचे वैशिष्ट आहे.
मंदिरात रामलक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. पूर्वी पासून रामनवमी उत्सव चालू आहे. श्री बापूराव आठवले यांनी सदर मंदिरासाठीही निधी जमवून दैनंदिन पूजाअर्चा व अभिषेकाची व्यवस्था केली आहे.
सदर मंदिर जीर्णाव्यवस्थेत आहे. श्री. विनायक शंकर जोशी यांनी भक्तांची समिती स्थापन करून निधी जमविण्यास सुरवात केली आहे. लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार होईल अशी आशा आहे.
कै. ना. स. उर्फ दादा लिमये यांनी मेहनत व पदरमान करून चांगले मंदिर उभारले आहे. श्रीकृष्ण जयंतीला येथे कथाकीर्तन , क्रीडा व दहीकाला उत्सव होतो.
बंदर विभागातील लोकांनी निधी जमवून सदर मंदिर सुधारले आहे व पूजेअर्चेची व्यवस्था केली.